बाई म्हणजे माझी आज्जी सुरकुतल्या चेहऱ्याची, टपोऱ्या पाणीदार
डोळ्यांची, डोक्यावर पदर घेतलेली, नाकात नथ घेतलेली, कपाळावरती ठसठशीत कुंकवाचा गोल
असणारी, गळा भर घेतलेले दागिने, मंगळसूत्र आणि दोन्ही हात बांगड्याने भरलेले अशी आमची
बाई घरासमोरील चुलीवरती भाकऱ्या थापत बसली होती. हिवाळ्याचे दिवस होते त्यामुळे आकाश
निरभ्र, स्वच्छ निळे होते. मात्र हवेमध्ये गारवा होता, कोरडी हवाच वाहत होती सर्वत्र.
घरासमोरील मोठ्या अंगणामध्ये एक चिंचेचे गडद झाड होते, उन्हाळ्यातल्या सुट्ट्यात त्याच
चिंचेच्या झाडा खाली थंडावा असायचा. झाडाखाली आमची गुरे बांधलेली असायची गाय, वासरू,
म्हैस दोन-तीन जनावर असायचे. त्यादिवशी सकाळी आबा म्हणजे माझा आज्जा गुरांना दाणापाणी
करत होता. आई बाबा सकाळीच रानात कामाला गेलेले, आज आमच्या रानात खळ होते. त्यामुळे
दोघे सकाळी लवकर आवरून घराबाहेर पडले. तसा आम्हाला लई मोकाट रान होतं, पण कामाचं फक्त
पाच एकर, बाकी सगळं खडकाळ. त्यामुळे खालच्या रानात वर्षभर काम चालायचं. माझं घर गावात
शेवटच्या अंगाला होते. घरासमोर बाईने लावलेली अनेक छोटी मोठी झाडे होती, फुलांची, फळाची
झाड, वेली, गुरांचा गोठा होता. दगडी बांधकामातलं जुन्या पद्धतीचा मातीच्या माळवदाचं
घर होतं. समोर बरीच मोकळी जागा होती त्या जागेत मी आणि माझा लहान भाऊ खेळत असायचो.
कधी कधी माझे मित्र सुद्धा यायचे खेळायला पण आज मात्र आम्ही दोघेच होतो.
सकाळचे सव्वा दहा वाजत आले होते, ही वेळ मला शाळेत जायची असते. धाकट्या भावाने अजून शाळेचे तोंड बघितले नव्हते. त्याला शाळेत घालायला अजून वर्षभराचा अवधी होता. मी इयत्ता चौथीत शिकत होतो, एकाच इयत्तेत दोन वर्ष काढल्यामुळे मागे पडलो होतो. शाळेत जायचं मला भयानक कंटाळा पण सगळे म्हणतात म्हणून शिकायचे आणि शिकण्यासाठी शाळेत जायचे हे ठरवलेले. तसे शाळेत गेल्यावर काय होतं हे मला अजून कळालेलंच नव्हतं. बाईने आवाज दिल्यावरती मला शाळेत जायची आठवण झाली. भावाला आबाजवळ सोडून बाई जवळ आलो. आबांनी त्याला बाजेवर बसवलं आणि तंबाखूचा बार तोंडात भरला. बाईने डोक्यावरच्या पदर पुढे ओढत चुलीवरची भाकर ताटात टाकली आणि म्हणाली "खा लवकर शाळेत जायचं आहे तुला!", मी नुसती मान हलवत धुतलेले हात चड्डीला पुसले आणि मांडी घालून ताटावर बसलो. अंगणात मोकळ्या थंड हवेत जेवण्यात काही वेगळीच मज्जा असते. उघड्या आकाशाखाली जमिनीवर बसून ताटात रचलेली गरम भाकरीचे चार तुकडे दूध आणि शेंगदाण्याची चटणी एवढेच आज ताटात होतं. मी बसलेले बघून बाई पुन्हा एकदा माझ्याकडे बघून म्हणाली "खा लवकर उशीर होईल!”, जेवण झालं की घाईत पाणी प्यालो आणि तोंडावरून हात फिरवला.
आज शाळेत मला एकट्यानेच चालत जावं लागणार होतं. बाबा शेतात
गेला होता म्हणून, नाहीतर तोच गाडीवर सोडत असतो. हात धुतले आणि शाळेचा गणवेश चढवला,
केस विंचरले, खुंटीला टांगून ठेवलेलं दप्तर पाठीवरती घेतलं आणि पायात चपला घातल्या.
बाईनं तोपर्यंत डब्बा तयार केलेला होता. डब्बा हातात घेतला तेव्हा म्हातारी मला म्हणाली,
"सगळं खाऊन घे ओ" मी होकारार्थी मान डोळवत "हो" म्हणालो, आणि दप्तरात
डब्बा कोंबला. शाळेकडे निघालो. वाट तुडवीत शाळेच्या दिशेने चाललो होतो, मध्येच वाऱ्याची
मंद झुळूक येत होती आणि अंगावरती काटाच उभा राहतो. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळं
अंग पांढरट झालं होतं. त्यात आज आई लवकर शेतात गेलेली होती त्यामुळे तेल सुद्धा लावलेले
नव्हते. शाळेत वेळेवर पोहोचायचं म्हणून झपझप पावलं टाकत शाळेच्या दिशेने
जात असताना डोक्यावरती पंखा फिरण्याचा आवाज सुरू झाला. जोरात हवा सुटली, ववटळ यावी
तशी गर-गर वार फिरायला लागले. वर बघितलं तर डोक्यावरून एक हेलिकॅप्टर जात होता, गरगर
जोरात फिरणारा त्याचा पंखा आणि त्याचा तो आवाज कंठळ्या बसवत होता. हेलिकॉप्टर मला लई
आवडायचं, मागे गावातल्या जत्रेमधून मामांना माझ्यासाठी एक चावीच हेलिकॉप्टर आणलं होतं.
त्याला चावी दिली की ते जागेवरून चालायचं आणि पंखा फिरायचा. तेव्हापासून मला हेलिकॉप्टरचे
प्रचंड आकर्षण निर्माण झाले होता. जवळ असलेल्या तालुक्याच्या गावात हेलिकॉप्टर आलं
होत. तसं हेलिकॉप्टर आमच्या गावावरून सारखे जातात असे नाही, कधीतरी वर्ष दोन वर्षातून
एखादे जाते, पण ते जाताना पाहण्यात सुद्धा मज्जा असते. मागे एकदा आले होते तेव्हा घरकच्या
छपरा वर चढून पाहिले. आज शाळेच्या रस्त्यावर असताना दिसले. ते आकाशात कसं उडत असेल
याचाच मी विचार करत बसायचो. हेलिकॉप्टर आकाशात कसं उडते? मग आपण बसल्यावरती सुद्धा
हेलिकॉप्टर उडते का? मग त्याला कोण उडवतात? ते उडून कुठे पोहोचत? आणि समजा हवेत उडलं
तर खाली पडतं का? असे एक ना अनेक प्रश्न माझ्या डोक्यात फिरत असायचे.
कधी बाबाला, कधी मामाला, तर कधी आबाला, किंवा जो भेटेल त्या
सगळ्यांना हेच विचारायचो. प्रत्येक जण त्याच्या क्षमतेप्रमाणे उत्तर द्यायचे, एकदा
रात्री झोपताना बाईला विचारलं तेव्हा ती म्हणाली, "मला बाई काय माहित
!, पण आता जेव्हा येईल तेव्हा दाखवते तुला"
शाळेच्या रस्त्यावरती असताना, मला बाईने बोललेल्या या गोष्टीचा
साक्षात्कार झाला आणि मी शाळेत जात असलेला तडक वापस घराकडे निघालो….
