Friday, 23 February 2024

कथा: ३

हातात ले पुस्तक खाली ठेवले तेव्हा घड्याळात संध्याकाळचे ठोके पडत होते. आळसलेला आजचा दिवस मागील दोन तासा पासून वाचण्या मुळे बरा गेला असं म्हणावं लागेल. फार असा काही वाचनाचा छंद वगैरे मला नाही पण एखाद आवडीचं पुस्तक हाती पडलं कि वाचून संपवल्या शिवाय राहवत सुद्धा नाही. तीन-चार महिन्या नंतर हे पुस्तक हातात घेतलं आणि वाचायला सुरवात केली, दोन दिवसा पासून वाचत आहे झाली १०० पाने वाचुन पण अजून बरच बाकी आहे. पुस्तकात पेज मार्क करून पुस्तक ठेऊन दिल आणि बायकोला चहा करता आरोळी ठोकली. तशी ती नाराजीतच बाहेर या! मग करते म्हणाली, बायकोच्या या वागण्याचा राग आला होता पण काय करणार, चहा पाहिजे तर सोसावे लागेल सगळं. मी सुद्धा आळस देत जागे वरून उठलो आणि डायनींग रूम मध्ये येऊन ग्लास पाण्याने भरला आणि पाणी प्यालो. मी माझ्या स्टडी मध्ये पुस्तक वाचत बसलो होतो तर बायको बेडरूम मध्ये तिच्या आवडीची सिरीयल पाहत होती. सिरीयल कसली, नवरा बायकोचे भांडण पाहत बसली होती, नवीन आयडिया येते भांडायची बाकी काय. पाण्याचा ग्लास टेबल वर ठेवला आणि बेडरूमच्या दारात येऊन पुन्हा बायकोला चहाची आठवण केली, तिची एकाग्रता भंग केल्याने ती नाराज होती, एपिसोड अर्धवट सोडावा लागणार होता तिला, माझ्या चहा करता. नाईलाज होऊन तिने टीव्ही बंद केला आणि चहा करायला किचन मध्ये गेली.  तिने गॅस वर उकळत पाणी, त्यात आले, विलायची, लवंग टाकले सोबत गवती चहा च्या पात्याचे तुकडे करून टाकले. तेव्हा पश्चिमेला क्षितिजा वरती सूर्य मावळताना सर्वत्र तांबडं फुटल्या प्रमाणे आकाश तांबडं झालं होते. खिडकीतून तिरक्या पडणाऱ्या सूर्य किरणा मुळे माझ्या घरात सुद्धा तोच तांबडा प्रकाश पसरला होता. त्या तांबड्या प्रकाशात बायकोने गॅस वरच्या उकळत्या पाण्यात आता चहाच्या मसाल्या बरोबर चहा पावडर टाकली आणि त्याचा सुगंध सर्वत्र पसरला, चहाच्या वासाने मेंदूला झणझण्या आल्या आणि आळस पळाला. चहाच्या वाफा त्या तांबड्या प्रकाशात स्पष्ट दिसत होत्या. बायकोने दोन कपात चहा गाळून ट्रे मध्ये ठेऊन आणला त्या वेळी मी सोफ्या वरती कसला सा विचार करत बसलो होतो. माझी तंद्री तुटली ती चहाच्या वासाने आणि बायकोच्या आवाजाने "चहा घे" या शब्दाने, मी नकळत हात पुढे केला. कपाच्या कानाला न पकडता कपाला पकडल्या मुळे बोटाना हलकासा चटका बसला, पण लगेच दुसऱ्या हाताने कपाचा कान पकडून बोटांवर हालकेशी फुंकर घातली तेव्हा जरा बरे वाटले. बायकोला मालिकेचा एपिसोड मध्ये सोडून उठवल्याचा राग तिने व्यक्त केला असेल असे जाणवले. कप हातात घेतला तेव्हा चहा वरती हलकीशी साय पसरली होती, तिला दोन बोटांच्या चिमटीत पकडून मी कपच्या कोपऱ्यावरती साल सोलल्या प्रमाणे टांगून ठेवले.  चहाचा बारीक सिप ओठांच्या आड केला. म्युजिक प्लेअर वरती रफी साहेबांचे गाणे चालू होते, वा... चहा पिताना रफी साहेबांच्या गाण्याची मजाच काही और आहे, ८० ला रफी साहेब गेले आणि त्या अगोदर  ७६ ला मुकेश अमेरिका दौऱ्यावर असताना गेले. दोन मोठ्या गायकांना आजची पिढी मुकली होती. पुढे ७ वर्ष किशोर कुमारांचे चित्रपट सृष्टी वर अधिराज्य राहिले. मुकेश गेले तेव्हा मी गावी शिकत होतो आणि रफी साहेब गेले तेव्हा इंजिनेरींग ला कोल्हापूरला आलो होतो.  


मागील दोन वर्षा पासून हा माझा ठरलेला दिनक्रम आहे. दोन वर्षांपूर्वी निवृत्त झालो आणि आयुष्य एकदम निवांत झाले. नोकरीच्या ठिकाणी कंपनीत मला चहाची सवय लागली. तसा मी कोल्हापूर जिल्यातील गडहिंग्लज तालुक्यातला, पैलवानाच्या गावातला आणि दुभते जनावर असलेल्या घरातला. त्यामुळे १० वी पर्यंत सकाळ दुपार दुध च असायचे, पैलवानकी मी कधी केली नाही, ते दंड बैठक, सकाळी उठून व्यायाम वगैरे मला कधी जमलं नाही. ८० च्या दशकात तालुका सोडून पुढील शिक्षणा साठी कोल्हापूरला आलो  तेव्हा पहिल्यांदा चहा प्यालो. तो पर्यंत फारशी चहाची आवड नव्हती. कोल्हापुरात शिकताना रहायला हॉस्टेल ला होतो आणि हॉस्टेल ला दूध मिळेल याची शक्यता नसल्यामुळे सकाळी चहा प्यायला लागलो. हॉस्टेल बाहेरील टपरी वरचा चहा म्हणजे दूध कम पाणी ज्यादा असा होता. फार चव लागायची नाही पण प्यायचो कसा तरी. पुढे इंजिनेरींग पास झाल्यावर पुण्यात एका कंपनीत नोकरीला लागलो, दुचाकी गाड्यांचे छोटे पार्ट बनवणारी कंपनी होती. त्या कंपनीत सकाळी कामावर आल्यावर, दुपारी आणि संध्याकाळी घरी  निघताना असा तीनदा चहा मिळायचा. तिथल्या चहाला वेगळीच चव होती, आल घातलेल्या चहाची सवय आणि आवड मला त्या कंपनी मधूनच लागली. सगळे लाईन वरती काम करणारे कामगार होते, मी सुद्धा त्यांच्या सोबत लाईन वरती थांबून काम करायचो त्यामुळे दिवसातून तीन-चार  वेळेस चहा प्यायची सवय लागली. नंतर कंपनी बदलली, कामाचे स्वरूप बदलले आणि चहाची सवय सुद्धा बदलली. नवीन नवीन कामाला लागल्यावर मला सिगरेटचे झुरके ओढत चहा प्यायची दांडगी हौस होती तसा एकदोनदा प्रयत्न सुद्धा मी करून पहिला पण सिगरेटच्या धुराचा जोरात ठसका बसला आणि घसा सुद्धा बसला. त्यामुळे नंतर हा प्रकार मी सोडून दिला आणि फक्त चहा पिणे सुरु ठेवले. माझ्या सोबतचे इतर सहकारी बिनधास्त सिगरेट ओढत व चहा पीत मी मात्र पुन्हा तसे करण्याचे धाडस केले नाही. कॉफी फार अशी आवडली नाही मला, उगाच मोठेपणा मिरवण्यासाठी मध्यम वर्गातून उच्च वर्गात गेलो आहे म्हणून काहीजण कॉफी पितात. मागे एकदा अमेरिकेला कंपनीच्या काम निमित्याने जाणे झाले, चांगले तीन- चार वेळेस जाणे झाले अमेरिकेत, तिथे गेल्यावर मला चहाच मिळणे कठीण झाले. जाईल त्या रेस्टोरंट मध्ये कॉफी सर्व्ह केली जायची नंतर मला अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धातील बोस्टन टी पार्टी बद्दल कळलं आणि अमेरिकेत कॉफी का प्रसिद्ध आहे याच राजकीय कारण सुद्धा समजलं.

अजून दिवस मावळ्याचा होता, पण सूर्याला मावळतीचे वेध लागले होते. संध्याकाळचा चहा पिताना चहातली गोडी कमी होती पण आयुष्यातला गोडवा टिकून होता. चहा मुळे आलेला ताजे पणा चेहऱ्यावर होता. दिवस भराचा आळस नाहीसा झाला होता आणि संध्याकाळची प्रसन्नता आली होती. चहा पिऊन झाल्यावरती बायकोने दोन्ही कप किचनच्या सिंक मध्ये ठेवले आणि पुन्हा बेडरूम मधून नवरा बायकोच्या भांडण्या चा आवाज सुरु झाला मी ओळखलं तिची पुढची सिरीयल सुरु झाली होती. मी काही वेळ सोफ्यावर एकटाच बसून होतो. रफी साहेबांचे गाणे संपले आणि उदित नारायण - कुमार सानू सुरु झाले तेव्हा उठले व म्युजिक प्लेअर बंद केला आणि स्टडी मध्ये पुन्हा येऊन एकटेच उरलेले पुस्तक वाचण्यास सुरवात केली, एव्हाना सूर्य पश्चिमेला मावळा होता आणि तिन्ही संजा झाल्या होत्या, आता दिवे लावायची वेळ झाली होती.

 

विराज वि देवडीकर


Saturday, 10 February 2024

कथा २

सकाळी साडे पाच चा अलार्म कानात गरम गरम शिसे ओतावे त्याप्रमाणे शिरला आणि मेंदूला झंझण्या आल्या, डोक्यात जातो हा अलार्म माझ्या, रोज सकाळी नरकातल्या कर्कश्य आरोळी प्रमाणे तो माझी झोप मोड करत असतो. पहिल्या दोन वेळेस त्याच्या कडे दुर्लक्ष केलं पण तिसऱ्या वेळी शेजारून अलार्म सोबत खेसकण्याचा आवाज आला आणि साखर झोपीतून मी पूर्ण तंद्रीत आले, अंगावरचा शेजाऱ्याचा हात बाजूला काढला तसा तो त्या कुशीवर वळला आणि मी बेडवर पाय खाली सोडून उठून बसले. दोन मिनिटे आळस देण्यात गेली, झोप अजून डोळ्यातच होती. मात्र तसेच डोळे चोळत झोपीला दूर ढकलले. किलकिल्या डोळ्यांनी हाताने चाचपडत बेडच्या शेजारी असलेल्या टीपॉय वरून मोबाईल हातात घेतला आणि दिवसाची सुरवात व्हाटसप चाळत झाली. व्हाट्सप नंतर फेसबुक आणि मग इन्स्टा उघडलले, इन्स्टा वरती ८-१० रिल्स बघितल्या आणि पुन्हा मोबाईल चार्जिंग ला लावून मोकळे सोडलेले केस बो ने बांधत वॉशरूम कडे गेले, बाहेर येई पर्यंत ६ वाजत होते. मुलांच्या बेडरूम मध्ये आले तेव्हा रेवा एकटीच झोपली होती, ती आता ७ वीला गेली होती, तिची शाळा सकाळी ७.३० ला असते त्यामुळे तिला सव्वा सहा पर्यंत मी रोजच तिला उठवत असते. त्या प्रमाणे तिला उठवले आणि ब्रश हातात दिला. आज सोमवार होता त्यामुळे ऑफिस ला जायची घाई होती. ऑफिस ला ९ पर्यंत पंचिंग केली तर फुल डे लागतो नाहीत हाफ डे, त्यामुळे मला कसे हि करून सव्वा आठ ला घरातून निघावे लागते. आमच्या सारख्या कॉर्पोरेट कामगारांचे हेच दुःख आहे. वापस बेडरूम मध्ये आले तेव्हा नवरा अजून घोरतच पडला होता. काल रात्री उशिरा तो दिल्ली वरून आला रात्री दोन वाजता त्याच फ्लाईट पुण्यात आले असेल. एअर पोर्ट वरून घरी यायला साधारण एक तास लागतो, तो रात्री उशिरा कधी आला माझ्या लक्षात आले नाही. आम्ही दोघी माय लेकींनी रात्री जेवण घेतला आणि दहा साडे दहाला झोपायला गेलो. माझा नवरा VP आहे एका MNC मध्ये त्यामुळे महिन्यातले १५ दिवस दिल्ली मुंबई कलकत्ता आणि चेन्नई या ठिकाणी जातात त्याचे, मी आणि माझी मुलगी रेवा पुण्यातच असतेत तर आमचा एकुलता एक मुलगा नकुल, सध्या IIT नागपूरला असतो. मागील वर्षी त्याचे IIT ला selection झाले. रेवा पेक्षा तो हुशार आहे, त्याला इंजिनेरींग ची आवड होती, IIT त्याचे स्वप्न होते त्या करता त्याने प्रयत्न केले. मागील आठवड्यातच तो नागपूरला गेला होता. प्रीप्रेशन लिव्ह करता तो पुण्यात होता. ह्या आठवड्यात त्याची एक्साम आहे. अंघोळ करून बाहेर निघाले तेव्हा घरकाम करणाऱ्या मावशी आल्या होत्या, सोबत स्वयंपाक करणाऱ्या मावशी सुद्धा आल्या होत्या. त्यांनी माझ्या करता आणि रेवा करता चहा आणि नाश्ता बनवून दिली, आमच्या दोघींचा टिफिन त्यांनी टेबलवर बनवून ठेवला. रेवा ची स्कूल बस आल्यावर ती निघाली, ती दुपारी अडीच पर्यंत घरी येणार होती. ती गेल्यावर मी नाश्ता केला आणि नवऱ्याला उठवायला बेडरूम मध्ये गेले. तो अजून झोपेतच होता.



मी माझी गाडी काढली आणि ऑफिस ला निघाले. घराच्या दरवाजातून एकदा बाहेर पडले कि संसाराच्या बंधनाचे सर्व धागे तोडलेले असतात. आता लन्च आवर पर्यंत घरातील सर्व बंधनातून मी मुक्त होते. स्त्रीचे स्त्रीपण नाजूक असते पण स्त्रीचे पुरुष पण पुरुष पेक्षा कठीण असते. मागच्या दहा बारा वर्षात नोकरी आणि घर यांच्या व्यापात स्वतःची ओळखच मी विसरले आहे. रोज ची सकाळ अशीच होते आणि दिवसाचा शेवट स्वतःला भूतकाळात सापडण्यात जातो. ऑफिस मधील कामाच्या राड्यात आणि वातावरणात आपण त्याप्रमाणेच निर्जीव आणि शून्य बनत जात असतोत. तशी लग्न नंतर माझी वाटचाल एक सुख वस्तू कुटुबांत झाली. माझं आणि उमेश च अरेन्ज मॅरेज होते. तो पुण्यातला मी मराठवाड्यतली, आम्ही दोघे ही वेग वेगळ्या वातावरणात वाढलेले, वेग वेगवेळ्या क्षेत्रात शिक्षण घेतलेले. पण नियतीने हा योग जळून आणला आणि आता १८ वर्ष झाली आमच्या लग्नाला अजून टिकून आहे. सकाळी अंजलीचा व्हाट्स अप पाहिला पण अजून वाचला नव्हता सकाळच्या गडबडीत तो unseen च राहिला. आता लंच टाइम मध्ये जेवताना लक्षत आले. पोळीचा तुकडा मोडत व्हाट्स अप उघडले आणि मेसेज वाचला. अंजली माझी Post Graduation ची मैत्रीण पुण्यात आल्यावर भेटलेली, मी मराठवाड्यातून B. pharm करून आले पुण्यात PG करता व अंजली भेटली, ती पुण्यातली त्यामुळे तिच्या स्वभावात पुणेकर दिसत असे. पुण्याची आणि माझी ओळख तिच्या मुळेच झाली, JM रोड, FC रोड, कॅम्प, संभाजी उद्यान, शनिवार वाडा, पर्वती अनेक ठिकाणच्या आठवणी तिच्या सोबतच्या आहेत. लेक्चर बुडवून या ठिकाणच्या भटकंतीत अंजली आणि पुणे मला भेटले. दोन वर्षा खाली तीच डिवोर्स झाला होता. एका मोठ्या कंपनीत गलेलठ्ठ पगाराची तिला नोकरी आहे, स्वतःचा कोथरूडला 3 BHK फ्लॅट आणि एक मुलगा जो आठवड्यातले पाच दिवस तिच्या कडे तर दोन दिवस नवऱ्या कडे असतो. महिन्या भरा खाली एका शनिवारी आम्ही भेटलो होतो पण आज तिचा मेसेज पाहून नवल वाटले. जेवत असताना मोबाईल हातात घेऊन तिचा मेसेज वाचला आणि अचानक झर्रकन कॉलेज च्या आठवणी डोळ्या समोरून गेल्या. काय दिवस होते ते, स्वःछंदी आयुष्य होत ते, कसल्याच प्रश्नांची फिकीर नव्हती. उद्याची काळजी नव्हती आणि आजची कदर नव्हती. आस होती फक्त उधळून उन्मत्त माजवण्याची. कॉलेज मधलं आयुष्यच वेगळं असत. आमच्या PG च्या Batch च गेट टू गेदर आमच्या कॉलेज ने ठेवले होते आणि त्याचे निमंत्रण व रजिस्ट्रेशन अंजलीने मला पाठवले होते. त्यामुळे या सगळ्या भूत काळाची उजळणी झाली. निमंत्रण आणि रजिस्ट्रेशन वाचून झाल्यावर अंजलीला कळवते म्हणून मेसेज केला आणि जेवण उरकले. उरलेला दिवस तसा कामात गेला पण पुन्हा रात्री गेट टू गेदर चा विषय डोक्यात आला. उमेशला त्या विषयी बोलून बघितले पण त्याचा प्रतिसाद थंडच होता. माझं सगळं ऐकू न घेतांना त्याने ओके, हां, चालतंय कि, उत्तम अशाच त्रोटक प्रतिक्रिया दिल्या आणि शेवटी लॅपटॉप मध्ये तोंड खुपसून बसला. मी सुद्धा झोपण्या पूर्वी थोडा विचार केला आणि अंजलीला पुढच्या आठवड्यात कळते म्हणून सांगितले.

एक मन कॉलेज च्या री युनियन ला जायला उत्सुक होते तर एक पुन्हा त्या आठवणी त गुंतू इच्छित नव्हते. अंजलीच्या आग्रह खातर मी नाव नोंदवले होते पण पुन्हा पुन्हा वाटत होते त्या सगळ्यात आता गुंतायचं नाही. त्या सगळ्या आठवणी आता खूप मागे पडल्या आहे, आता पुला खालून प्रचंड पाणी गेले आहे. आपण कसे काय त्यात गुंतू , आता च आयुष्य खूप sorted मग पुन्हा कशाला गुंता गुंत करायची स्वतः होऊन. "त्या सगळ्यात का त्या एकात !" हाच खरा प्रश्न होता राहू राहून डोळ्या समोर येत होता. इच्छेच्या दोरा वरती मन हिंदोळे खात होते, कधी होकार तर कधी नकार यावर झुलत होते. आठवडा भरा वरती री युनियन आले होते, पण अजूनसुद्धा अंजलीला निश्चिती कळवली नव्हती. माझ्यात आत्मविश्वास अजून सुद्धा नव्हता त्या एकत्रीकरणाला उपस्थित राहण्याचा, मनातली भीती कपाळा वरच्या आठ्यात स्पष्ट पणे मला आरशात दिसलात होती. कॉलेज संपल्या नंतर पुण्यात असून सुद्धा इकडे फिरकाने झाले नाही, १० वर्षा खाली नाही म्हणायला होणाच्या तरी ऍडमिशन करता येणे झाले होते. पण त्या नंतर ची हि पहिलीच वेळ होती. नाही हो करत कॉलेज च्या कॅम्पस मध्ये आले होते आज अंजली सोबत, पण कॉलेज चे पालटलेले रूप पाहून नवले वाटले. शे दोनशे च्या batch मध्ये फक्त काही चेहरे आठवत होते, त्यात सुद्धा त्यांची नावे माहित असणारे बोटावरती मोजण्या इतके होते. प्रत्येक जण एकमेकांना भेटत होते मी प्रत्येकाला नव्याने ओळखत होते, री युनियनचा तोच रटाळ कार्यक्रम, तीच रटाळ भाषणे सुरु होती. मुख्य कार्यक्रमानंतर मी प्रत्येकाला बोलत होते पण का कोणास ठाऊक या शे-दोनशे जना मध्ये मी कोणाला तरी शोधात होते. तीन तासांच्या कार्यक्रमात प्रत्येक चेहरा ओळखण्याचा प्रयत्न करत होते पण १८ वर्षा पूर्वीचा तो ओळखीचा चेहरा सापडत नव्हता. मागे कोणाकडून तरी कळले होते तो इंदोर ला असतो म्हणून पण कॉलेज नंतर तो कधी भेटलाच नव्हता. डोक्यात एक लख वीज चमकली आणि अनुभूती झाली जरी तो भेटला तरी इतक्या वर्षा नंतर मी काय बोलणार त्याच्याशी, हा तर वेगळाच प्रश्न होता निर्माण झाला. शेवटी कार्यक्रम झाल्यानंतर हॉल मधून बाहेर पडताना तो भेटला, बघून हसला. सुरवातीच्या बोलण्यात एक शिष्टाचार होता, अवघडले पणा होता.  इतक्या वर्षांनी भेटल्यावर जे बोलणे होते तेवढेच बोलणे झाले. जुजबी बोलण्याच्या पुढे व्यक्त व्हायला ती जागा हि नव्हती आणि तसे शब्द सुद्धा नव्हते. इच्छा असून सुद्धा त्याचा फोन नंबर मागू शकले नाही आणि स्वतःचा देऊ शकले नाही. एकमेकांच्या संपर्कात रहायचे कि पुन्हा गर्दीत मिसळून जायचे हेच अजून नक्की नव्हते. अंजली लांबून आम्हला बघत होती गाडीत बसल्यावर तिने मला विचारले भेट झाली का मी होम्हणत चेहरा फिरवून काचेतून बाहेर बघत होते. आणि रेडिओ वर तेव्हाच बाबू जींचं (सुधीर फडकेंचं) गाणं वाजत होत,

त्या पहिल्या भेटीच्या आज लोपल्या खुणा,

वाळल्या फुलात गंध शोधतो पुन्हा,

गीत ये नसे जुळून, भंगल्या सुरातुनी,

एकान्ती मज समीप, तीच तूहि कामिनी.

 

विराज वि देवडीकर 

कथा ९

  बाई म्हणजे माझी आज्जी सुरकुतल्या चेहऱ्याची, टपोऱ्या पाणीदार डोळ्यांची, डोक्यावर पदर घेतलेली, नाकात नथ घेतलेली, कपाळावरती ठसठशीत कुंकवाचा ग...