Tuesday, 3 March 2026

कथा ९

 

बाई म्हणजे माझी आज्जी सुरकुतल्या चेहऱ्याची, टपोऱ्या पाणीदार डोळ्यांची, डोक्यावर पदर घेतलेली, नाकात नथ घेतलेली, कपाळावरती ठसठशीत कुंकवाचा गोल असणारी, गळा भर घेतलेले दागिने, मंगळसूत्र आणि दोन्ही हात बांगड्याने भरलेले अशी आमची बाई घरासमोरील चुलीवरती भाकऱ्या थापत बसली होती. हिवाळ्याचे दिवस होते त्यामुळे आकाश निरभ्र, स्वच्छ निळे होते. मात्र हवेमध्ये गारवा होता, कोरडी हवाच वाहत होती सर्वत्र. घरासमोरील मोठ्या अंगणामध्ये एक चिंचेचे गडद झाड होते, उन्हाळ्यातल्या सुट्ट्यात त्याच चिंचेच्या झाडा खाली थंडावा असायचा. झाडाखाली आमची गुरे बांधलेली असायची गाय, वासरू, म्हैस दोन-तीन जनावर असायचे. त्यादिवशी सकाळी आबा म्हणजे माझा आज्जा गुरांना दाणापाणी करत होता. आई बाबा सकाळीच रानात कामाला गेलेले, आज आमच्या रानात खळ होते. त्यामुळे दोघे सकाळी लवकर आवरून घराबाहेर पडले. तसा आम्हाला लई मोकाट रान होतं, पण कामाचं फक्त पाच एकर, बाकी सगळं खडकाळ. त्यामुळे खालच्या रानात वर्षभर काम चालायचं. माझं घर गावात शेवटच्या अंगाला होते. घरासमोर बाईने लावलेली अनेक छोटी मोठी झाडे होती, फुलांची, फळाची झाड, वेली, गुरांचा गोठा होता. दगडी बांधकामातलं जुन्या पद्धतीचा मातीच्या माळवदाचं घर होतं. समोर बरीच मोकळी जागा होती त्या जागेत मी आणि माझा लहान भाऊ खेळत असायचो. कधी कधी माझे मित्र सुद्धा यायचे खेळायला पण आज मात्र आम्ही दोघेच होतो.

सकाळचे सव्वा दहा वाजत आले होते, ही वेळ मला शाळेत जायची असते. धाकट्या भावाने अजून शाळेचे तोंड बघितले नव्हते. त्याला शाळेत घालायला अजून वर्षभराचा अवधी होता. मी इयत्ता चौथीत शिकत होतो, एकाच इयत्तेत दोन वर्ष काढल्यामुळे मागे पडलो होतो. शाळेत जायचं मला भयानक कंटाळा पण सगळे म्हणतात म्हणून शिकायचे आणि शिकण्यासाठी शाळेत जायचे हे ठरवलेले. तसे शाळेत गेल्यावर  काय होतं हे मला अजून कळालेलंच नव्हतं. बाईने आवाज दिल्यावरती मला शाळेत जायची आठवण झाली. भावाला आबाजवळ सोडून बाई जवळ आलो. आबांनी त्याला बाजेवर बसवलं आणि तंबाखूचा बार तोंडात भरला. बाईने डोक्यावरच्या पदर पुढे ओढत चुलीवरची भाकर ताटात टाकली आणि म्हणाली "खा लवकर शाळेत जायचं आहे तुला!", मी नुसती मान हलवत धुतलेले हात चड्डीला पुसले आणि मांडी घालून ताटावर बसलो. अंगणात मोकळ्या थंड हवेत जेवण्यात काही वेगळीच मज्जा असते. उघड्या आकाशाखाली जमिनीवर बसून ताटात रचलेली गरम भाकरीचे चार तुकडे दूध आणि शेंगदाण्याची चटणी एवढेच आज ताटात होतं. मी बसलेले बघून बाई पुन्हा एकदा माझ्याकडे बघून म्हणाली "खा लवकर उशीर होईल!”, जेवण झालं की घाईत  पाणी प्यालो आणि तोंडावरून हात फिरवला. 


आज शाळेत मला एकट्यानेच चालत जावं लागणार होतं. बाबा शेतात गेला होता म्हणून, नाहीतर तोच गाडीवर सोडत असतो. हात धुतले आणि शाळेचा गणवेश चढवला, केस विंचरले, खुंटीला टांगून ठेवलेलं दप्तर पाठीवरती घेतलं आणि पायात चपला घातल्या. बाईनं तोपर्यंत डब्बा तयार केलेला होता. डब्बा हातात घेतला तेव्हा म्हातारी मला म्हणाली, "सगळं खाऊन घे ओ" मी होकारार्थी मान डोळवत "हो" म्हणालो, आणि दप्तरात डब्बा कोंबला. शाळेकडे निघालो. वाट तुडवीत शाळेच्या दिशेने चाललो होतो, मध्येच वाऱ्याची मंद झुळूक येत होती आणि अंगावरती काटाच उभा राहतो. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळं अंग पांढरट झालं होतं. त्यात आज आई लवकर शेतात गेलेली होती त्यामुळे तेल सुद्धा लावलेले नव्हते. शाळेत वेळेवर पोहोचायचं म्हणून झपझप पावलं टाकत  शाळेच्या दिशेने जात असताना डोक्यावरती पंखा फिरण्याचा आवाज सुरू झाला. जोरात हवा सुटली, ववटळ यावी तशी गर-गर वार फिरायला लागले. वर बघितलं तर डोक्यावरून एक हेलिकॅप्टर जात होता, गरगर जोरात फिरणारा त्याचा पंखा आणि त्याचा तो आवाज कंठळ्या बसवत होता. हेलिकॉप्टर मला लई आवडायचं, मागे गावातल्या जत्रेमधून मामांना माझ्यासाठी एक चावीच हेलिकॉप्टर आणलं होतं. त्याला चावी दिली की ते जागेवरून चालायचं आणि पंखा फिरायचा. तेव्हापासून मला हेलिकॉप्टरचे प्रचंड आकर्षण निर्माण झाले होता. जवळ असलेल्या तालुक्याच्या गावात हेलिकॉप्टर आलं होत. तसं हेलिकॉप्टर आमच्या गावावरून सारखे जातात असे नाही, कधीतरी वर्ष दोन वर्षातून एखादे जाते, पण ते जाताना पाहण्यात सुद्धा मज्जा असते. मागे एकदा आले होते तेव्हा घरकच्या छपरा वर चढून पाहिले. आज शाळेच्या रस्त्यावर असताना दिसले. ते आकाशात कसं उडत असेल याचाच मी विचार करत बसायचो. हेलिकॉप्टर आकाशात कसं उडते? मग आपण बसल्यावरती सुद्धा हेलिकॉप्टर उडते का? मग त्याला कोण उडवतात? ते उडून कुठे पोहोचत? आणि समजा हवेत उडलं तर खाली पडतं का? असे एक ना अनेक प्रश्न माझ्या डोक्यात फिरत असायचे. 

कधी बाबाला, कधी मामाला, तर कधी आबाला, किंवा जो भेटेल त्या सगळ्यांना हेच विचारायचो. प्रत्येक जण त्याच्या क्षमतेप्रमाणे उत्तर द्यायचे, एकदा रात्री झोपताना बाईला विचारलं तेव्हा ती म्हणाली, "मला बाई काय माहित !,  पण आता जेव्हा येईल तेव्हा दाखवते तुला"

शाळेच्या रस्त्यावरती असताना, मला बाईने बोललेल्या या गोष्टीचा साक्षात्कार झाला आणि मी शाळेत जात असलेला तडक वापस घराकडे निघालो….

Saturday, 24 January 2026

कथा ८

 

रागिणीच्या मोबाईलची रिंग वाजली तेव्हा घड्याळात सात सव्वा सात झालेले असतील. नुकतीच रागिनी तिचं बँकेतले सगळं काम संपवून घरी परतली होती फ्रेश होण्याकरता बाथरूम मध्ये गेलेली असताना मोबाईलची रिंग वाजली. मागचे सहा वर्षापासून रागिनी एका नॅशनलाईज बँकेमध्ये चांगल्या हुद्द्यावरती काम करत होते, तीन वर्षाखाली तिचं तरुण सोबत लग्न झालं. तरुण तिचे लव मॅरेज होतं. पाच वर्षापासून ते एकमेकाला ओळखत होते. नक्की आठवत नाही पण कुठल्याशा कार्यक्रमांमध्ये त्या दोघांची भेट झाली, भेटीचे रूपांतर मैत्री मध्ये आणि मैत्रीचं प्रेमामध्ये झाले. घरच्यांसमोर ज्यावेळेस तरुण सोबतच्या लग्नाचा प्रस्ताव तिने मांडला त्यावेळी घरच्यांनी फार काही आढेवेढे घेता त्यांच्या लग्नाला संमती दिली. दोघेही कमावते आहेत, त्या एका कारणामुळेच तिच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला संमती दिलेली होती. तरुण सुद्धा एका चांगल्या कंपनीमध्ये मॅनेजर पदावर काम करत होता. दोघे सुद्धा मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले स्वतःच्या क्षमतेवर ते कमी वयात आपापल्या कार्यक्षेत्रात यशस्वी झाले, त्यामुळे दोघांच्याही घरच्यांना त्यांच्याबद्दल अभिमान आणि विश्वास होता होता. बाथरूम मधून बाहेर येऊन रागिनीने मोबाईल पाहिला तेव्हा तिला लक्षात आले की तरुणने तिला कॉल केलेला होता. आज दिवसभरात त्या दोघांची कसले संभाषण झालेले नव्हते. दिवसभरातील बँकेच्या कामांमध्ये रागिनी पूर्णपणे विसरून गेली होती की आज तरुणचा एका कंपनीमध्ये इंटरव्यू सुद्धा होता. आत्ता त्याचा कॉल पाहिल्यावर ती तिच्या लक्षात आले की आपण तरुणला इंटरव्यू बद्दल विचारलेले नाही. त्यामुळे तिने वापस तरुण ला फोन लावला,

" हॅलो,"

 "बोल ना"

"कसा झाला इंटरव्यू आजचा!"

"इंटरव्यू चांगला झाला, ते सांगतो मी तुला आल्यावरती, ऐक ना मला यायला उशीर होईल रम्या भेटला आहेत त्याच्यासोबत थोडी चर्चा करायची आहे "

"हम्म, मला वाटलंच होतं. जेवायला तरी येणार आहेस का!"

" नाही तू जेवून घे, इंटरव्यू मी तुला आल्यावर ती बोलतो, चल बाय बाय"

 "लवकर ये रे बाय "

एवढे बोलून झाल्यावर रागिनीने फोन टेबलवर ठेवला किचनकडे गेली. जेवायचं काय विचार करत असताना तिला किचनमध्ये सकाळचा उरलेला स्वयंपाक दिसला जो तिच्या एकटी साठी पुरेसा होता इतक्यात तिला भूक सुद्धा नव्हती, त्यामुळे तिने वापस हॉलमध्ये येऊन नेटफ्लिक्स वरती सिनेमा पहायचे ठरवले.

सहा महिन्या खाली कंपनी पॉलिटिक्सच्या नावा वरती तरुणने तडका फडकी राजीनामा दिला होता. त्यामुळे सध्या तू नवीन जॉब शोधत होता. पैशाची तशी टंचाई त्यांच्याकडे निर्माण झालेली होती अशातला भाग नाही. सहा महिन्यापासून तरुण घरी बसून वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये इंटरव्यू देत होता मात्र अजून पर्यंत त्याला पटेल अशी नोकरी मिळालेली नव्हती. प्रत्येक वेळी तुम्हाला नोकरी मिळताना पाहिजे त्या पगाराची, अपेक्षित हुद्याची आणि आहे त्या ठिकाणी नोकरी मिळेल याची सध्या तरी शाश्वती नाही. काहीतरी तडजोड ही करावीच लागते आणि त्यामुळेच मागील सहा महिन्यापासून तरुण घरी बसूनच होता. अनेकदा रागिनीने त्याला समजावून पाहिले की आता मिळतोय तो जॉब घे आणि नंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा सर्च कर पण तरुण ह्या गोष्टीला तयार नव्हता. लग्नाला तीन वर्ष होऊन सुद्धा अजून त्यांनी चान्स घेतला नव्हता. जेव्हा ठरवले तेव्हाच तरुण ने जॉब सोडला त्यामुळे त्यांचे प्लॅनिंग विस्कटले. ह्या अशा घरातल्या अस्थिर वातावरणामध्ये तरुण चान्स घ्यायला तयार नव्हता. पण या गोष्टीचा त्रास रागिणीला होत होता. घरातले पाहुणे कोणीही भेटले की हेच तिला विचारायचे.

 नेटफ्लिक्स वरती सिनेमा पाहत रागिणीला कधी झोप लागली कळालेच नाही, डोरबेल वाचल्यावर ती तिचा डोळा उघडला तेव्हा रात्रीचे सव्वा बारा झालेले होते. टीव्ही तसाच सुरू होता, की होल मधून तिने पाहिले तेव्हा दारावरती तरुण उभा असलेला तिला दिसला. तरुण ला पाहून तिने दरवाजा उघडला,



"झाली का चर्चा रम्या आणि रम सोबत!"

 "हो "

 शिरशिरी आणणारा रमचा वास रागिणीच्या मस्तकात शिरला,

"काय हे तरुण आज सुद्धा तू पिऊन आला आहेस!"

"अरे तसं नाही चर्चा करायला कुठेतरी बसायचं म्हणून हॉटेलमध्ये बसलो आणि हॉटेलमध्ये बसलो म्हणून दारू प्यालो, दे टाळी" असं म्हणून तरुण ने टाळी करता हात पुढे केला.

"शी, टाळ्या काय मागतोयस"

असं म्हणत रागिनी वळाली आणि बेडरूम कडे जायला निघाली. तरुण्य आत येत दरवाजा लावून घेतला. शूज काढले. तेव्हा रागिनी टीव्ही बंद करत होती. मागून येऊन तरुण ने रागिणीला मिठी मारली. तिच्या मानेवरती आपले ओठ फिरवत तो काही म्हणणार तेवढ्यात रागिनीने त्याला मागे ढकलले म्हणाली, "मला तो घाणेरडा वास देऊ नकोस,! तू जेवणार नसशीलच त्यामुळे टेबलवरचे अन्न फ्रीजमध्ये ठेव मी झोपायला चालले " एवढे बोलून ती बेडरूम मध्ये गेली, तेव्हा तरुण हॉलमध्येच आळसलेल्या चेहऱ्याने उभा होता. थोडा विचार करून तो सुद्धा बेडरूम मध्ये आला आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये गेला. फ्रेश होऊन बाहेर आला तोपर्यंत रागिनी बेडवरती झोपलेली होती, किंवा तसे भासत तरी होते. तो सुद्धा तिच्या शेजारी येऊन झोपला तिला जवळ ओढत त्याने पुन्हा एकदा प्रयत्न केला.

ती थोडी चिडत म्हणाली,

"तरुण तू अजून मला तुझ्या इंटरव्यू बद्दल सांगितलेलं नाहीस:! कसा झाला तो "

"अरे इंटरव्यू तर चांगलाच झाला, लवकरच ते त्यांची निश्चिती कळतील पण ऑन साईड जायला सांगत आहेत"

"ऑन साईड "

"हो, म्हणून तर विचार करत आहे मी "

"पण ऑन साईड कुठे!"

"चायना, ही वेकन्सी चायनातली आहे, काही वर्ष तरी तिकडे काम करावे लागेल"

"अरे पण तिकडचं कसं जमणार आपल्याला!"

"हो मला माहिती आहे, त्यामुळेच मी विचार करत आहे अजून त्यांच्याकडून तरी निश्चिती कुठे आली"

आता रागिनी तरुण च्या मिठीमध्ये शिरलेली होती, रागिनी म्हणाली, "पण तू काय ठरवलं आहेस?, "

 "त्यांच्याकडून होकार आला तर चायनाला जावं असं वाटत आहे ",

 "अरे पण माझ्या जॉबच काय तो तर मला सोडता येणार नाही, आणि सोडला तर पुन्हा मिळणार नाही "

 तरुण, " रागिनी रात्री साडेबारा वाजता माझा अजिबात मूड नाहीये ह्या गोष्टीवरती चर्चा करायचा, ज्या गोष्टी करताचा मूड आहे ते करूयात, "

असं म्हणून तरुण ने रागिणीला अजूनच जवळ ओढले, "ते आला आहे माझ्या लक्षात", रागिनी म्हणाली ती सुद्धा त्याला घट्ट बिलगली, त्याच्या छातीवरचा हात पोटावर खाली सरकवत रागिनीने तिचे ओठ त्याच्या ओठावरती ठेवले त्यानंतर वीस-पंचवीस मिनिटं रात्रीच्या निरव शांततेत फक्त त्या दोघांच्या श्वासाचा आवाज जाणवत राहिला.

तरुण चे डोळे उघडले तेव्हा सोसायटीतल्या मंदिरातील घंटा वाजत होती. रागिनी केव्हाच उठली होती तिची बँकेत जाण्याची तयारी सुरू होते. आरशासमोर उभारलेल्या रागिणी जवळ जात तरुणी तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा रागिनी त्याला म्हणाली "आता काही नको, मला ऑफिसला जायला उशीर होत आहे"

 "हम्म, तूच एकटीच जात आहेस ऑफिसला"

"हो, पण ही वेळ तुझ्या इच्छा पूर्ण करण्याची नाहीये, तरुण!" असं म्हणत रागिनीने खट्याळ हसत स्वतःची सुटका करून घेतली. तरुण सुद्धा ही  गोष्टी फार मनावर घेत बाथरूम मध्ये गेला. रागिनीने घरातून निघताना तरुण ला स्वयंपाक टेबलवर ठेवला आहे असे सांगितले आणि संध्याकाळी यायला उशीर होईल हे बोलली.

दुपारी लंच ब्रेक मध्ये रागिनी ने सौरभ ला बँकेच्या बाहेर भेटायला बोलावले, सौरभ तिचा जुना मित्र बँकिंग ची तयारी करताना पासून दोघेजण सोबत होते. नंतर दोघं सुद्धा एकाच बँकेत जॉईन झाले आणि काही वर्षांनी एकाच ब्रांचला काम करताना भेटले. रागिनी सौरभ ला तिचा जवळचा मित्र मानायचे त्यामुळे तिने कालच्या तरुण च्या इंटरव्यू बद्दल सौरभ शी बोलायचे ठरवले होते. सिगरेटचा एक झुरका मारत, रागिनीने सौरभ ला तरुण च्या इंटरव्यू बद्दल बोलली. सौरभ ने शांतपणे तिचे बोलणे ऐकून घेतले तो तिच्या बोलण्यावरती कसल्याही प्रकारे रिऍक्ट झाला नाही. बँके मधील आजच्या दिवसाचे काम संपल्यावर ती मात्र त्या दोघांनी रात्री एकत्र भेटायचे ठरवले होते. इकडे दुपारी तरुणला त्या कंपनीचा कन्फर्मेशन चा मेल आला जॉब लोकेशन चायनाचे असेल असे त्यांनी कळवले.....

 

विराज

कथा ९

  बाई म्हणजे माझी आज्जी सुरकुतल्या चेहऱ्याची, टपोऱ्या पाणीदार डोळ्यांची, डोक्यावर पदर घेतलेली, नाकात नथ घेतलेली, कपाळावरती ठसठशीत कुंकवाचा ग...