Saturday, 27 January 2024

कथा : १

 

आज रविवारचा दिवस होता, बाजारा पेक्षा गडा वरती जास्त विक्री होईल म्हणून गडा वरती जायचं असं कालच ठरवलं होत. सकाळीच ७.३० ला रात्रीच्या शिळ्या चपात्या आणि बायकोच्या हात चा चहा चा नाश्ता करून घरा बाहेर पडलो. ८ ची गाडी होती गडा करता, म्हणुन झापा झापा पावले टाकीत रस्ता तुडवत होतो. पारा वरच्या मारुती ला नमस्कार केला तेव्हा बामन नुकताच मारुतीला आला होता त्याची पूजा आजून बाकी होती. पेपर वाले आणि दूध वाले इकडून तिकडे फिरत होते. सोबत पोराला न्यायचा विचार होता पण त्याच्या शाळेच्या अभ्यासा मुळे नको म्हटले, तसा तो इतर वारी बाजारात दुकानावर येऊन बसत असे शाळे नंतर, पण आज त्याने येतो म्हटलं होता आणि मी नको म्हणालो. अर्ध्या रस्त्यात आलो तेवढ्यात सायकलच्या घंटी चा आवाज आणि पोराच्या बाबा-बाबा च्या ओरडण्याने भानावर आलो. दुपारचा जेवण्याचा डब्बा घरीच विसरला होता. बायकोने पोरा सोबत पाठवला, आणि वेळेवर खाऊन घ्या असा निरोप दिला. बायकोला माझी काळजी, डब्बा विसरणे नवीन नाही पण घाईत राहिला. माझ्या दोन्ही हातातल्या दोन बॅग आणि पाठीवरची एक पाहून पोरानं ए स्टी  स्टॅन्ड वरती सोडू का म्हणून विचारलं, पण मीच नको म्हणालो. डब्बा घेऊन भरा भरा चालायला लागलो. स्टॅन्ड वर पोहंचलो तेव्हा गडाची गाडी लागली नव्हती. म्हणून स्टॅन्ड वरच्या बाकड्यावरती सामान ठेवून बसलो. बॅग उचलून पाठीला कळ आलेली होती पण बाकड्याला टेकून बसल्यावर बरे वाटले.



रविवार असल्यामुळे आज गडा वर गर्दी होणार, फिरायला येणारे लोक, टिंगल टवाळ्या करणारे पोर- पोरी, शाळांच्या सहली ह्या मुळे गडा वर गर्दी होईल, माझ्या सारखे अनेक दुकानदार येणार त्यामुळे लवकर पोहचून मोक्याची जागा मिळवणे गरजेचे आहे. आज हजार बाराशे ची विक्री झाली तर हा आठवडा निघू शकेल. आज गडा वरती शहरातलेच नाही तर बाहेर गावचे लोक सुद्धा येणार मग हजार बाराशे काय दोन हजारांची विक्री होई. दुपार पर्यंतच आठशे नऊशे ची विक्री होती का नाही बघा, मागच्या रविवारी तरी धंदा मंदच होता साडे आठशे नऊशे रुपये कसे बसे झाले. त्यात सुद्धा दोन टुबा खराब निघाल्या त्याचे पैसे वापस करावे लागले ते वेगळेच. मागच्या रविवारी मला गडावर पोहचायला उशीरच झाला होता. ११.३० - १२.०० वाजता पोहंचल्यावर जागा सुद्धा नीट मिळत नाही. त्यात उन्ह डोक्यावर आली होती. सकाळची गडावर गेलेली लोक वापस यायला लागली होती. गडाच्या रस्त्यावर चालत जाणाऱ्या लोकांना चढाच्या ठिकाणी आवर्जून थांबावे लागते अशी जागा मिळाली कि विक्री जास्त होते. पण मागच्या रविवारी उतारा वरची आणि उन्हातली जागा मिळाली लोक थांबतच नव्हती, दुसरी जागा बघायला गेलो तर दोन कस्टमर रिकामं दुकान बघून निघून गेले. मग म्हटलं आहे त्या ठिकाणीच बसू संध्याकाळ पर्यंत, आणि त्यामुळे धंदा कमी झाला.

पण या रविवारी तस होणार नाही. मी आज  लवकर गडा वर पोहंचनार आणि मोक्याची जागा मिळणार. अजून स्टॅन्ड ला गाडी आली नव्हती, बाकड्याला टेकून बसल्यामुळे पाठीचे दुखणे कमी झाले होते. ट्युबा च्या तीन तीन बॅगा उचलून हाताला आणि पाठीला रग लागते. आपल्या ट्युबा म्हणजे सांधे दुखी, पाठ दुखी, गुडघे दुखी वर रामबाण उपाय आहे. आयुर्वेदिक उपचार असल्यामुळे सगळ्या दुखण्यावर आपल्या ट्युबा काम करतात. म्हणूनच मी याचा धंदा करायचं ठरवलं आणि सहा महिण्यापासून या ट्युबा गावभर विकत हिंडत असतो. कधी या गावच्या बाजारात कधी त्या गावच्या बाजारात, कधी शहराच्या ठिकाणी, कधी बगीच्या च्या समोर, मंदिर समोर किंवा गडा वर जिथं लोक जास्त तिथं आपलं दुकान टाकून बसतो. सहा महिन्याखाली या ट्युबा च्या कंपनीचा मार्केटिंग वाला मला पेठ रोड बाजारात भेटला होता. त्याने मला ह्या ट्युबा विकायची आयडिया दिली. ह्या ट्युबा खरंतर कशावरही वापरता येतात, भाजलं, कापलं, दुखलं, पायाच्या भेगा आणि बरच काही असं मार्केटिंग वाला म्हणाला होता. हातात पैसे चांगले सुटत होते म्हणून जुन दुकान बंद केलं आणि हे सुरु केलं. आता सव्वा आठ वाजत आले होते, अजून गाडीचा पत्ता नव्हता, गडावर जायला गाडी आर्धा तास तरी घेणार आणि गड चढायला आर्धा तास म्हणजे अजून एक तास लागणार होता दुकान मांडायला. गडावर गर्दी असेल नसेल काही काळात नाही. मुंबईतल्या दूरच्या भावाशी बोलणं झालं होत, तो मुंबईला ये म्हणत होता मला. मुंबईत फूट पाथ वरती अनेक दुकान मांडून बसतात. दिवसाची तीन चार हजारांची विक्री नक्की होते. तो स्वतः चार-पाच ठिकाणी बसतो. मला सुद्धा तेच वाटत आहे, गावातल्या शे- बाराशे पेक्षा मुंबई पुण्यातले तीन चार हजार बरे,  त्रास होईल पण पाहता येईल आता हि त्रास होतच आहे.

बाकड्यावर बसून पाय हालवत कधी फलाटा कडे तर कधी कंट्रोल रूम कडे पाहत होतो. तेवढ्यात गाडीचा कंडाक्टर आला आणि फलाटावर येऊन उभा राहिला. गाडी येण्याची सूचनाच होती ती, दोघं-तिघा प्रवाशांनी पुढे होऊन कंडाक्टर ला गाडीला किती वेळ आहे म्हणून विचारले सुद्धा, त्यावर खेकसत कंडाक्टर म्हणाला येईल कि कुठं जाती न येऊन. कंडाक्टर ने गाडी येईल म्हटल्यावर जीव भांड्यात पडला, तेव्ह्च काळा धूर सोडत लाला रंगाची ए स्टी फलाटावर लागत होती. तसे आम्ही ८-१० प्रवासी  गाडीला होतोत. गाडी आलेली दिसताच लगोलग सामान उचलून गाडीत चढण्या करता, हातात दोन आणि पाठीवर एक बॅग अडकवली आणि गाडीत चढलो, समोरच असलेले दरवाज्याच्या जवळ च्या पहिल्या सीट वर जागा पकडून बसलो, गडावर गाडीतून लगेच उतरता यावे म्हणून. गाडी गडावर जाणारी होती त्यामुळे रविवार असून सुद्धा गर्दी नसल्यामुळे मनाला काळजी लागली. गाडी निघे पर्यंत अजून ८-१० प्रवासी वाढले पण म्हणावी तशी गाडीला गर्दी नव्हती आणि त्यामुळे गडावर गर्दी होईल असे वाटत नव्हते. ए स्टी ला गर्दी कमी असेल तर गडा वर पण गर्दी कमी होईल, थोडेच सगळे स्वतःच्या गाड्या- घोड्याने गडावर येणार आहेत. पण सकाळची पहिलीच गाडी असल्यामुळे गर्दी कमी असेल असं मनात विचार केला. तोच विचार करत कंडाक्टर ला गडाच्या तिकिटाचे पैसे दिले, कंडाक्टर ने सुद्धा तंबाकूची पिचकारी खिडकीतून थुंकत पैसे मोजून घेतले आणि तिकीट कापले. सुट्टे पैसे आणि तिकीट देत कंडाक्टर रविवार असून सुद्धा शनिवार पेक्षा गाडीला गर्दी कमी कशी काय असे कंडाक्टर  म्हणाला व गाडी सोडण्याची डबल बेल दिली. आणि माझ्या डोक्यावरच्या आट्या अजून गडाद झाल्या होत्या.

4 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. पुढील कथा?..

    ReplyDelete
  3. एक नंबर.. छान.. 👍🏻👍🏻

    ReplyDelete
  4. धन्यवाद, कथा एवढीच आहे पुढील भाग नाही.

    ReplyDelete

कथा ९

  बाई म्हणजे माझी आज्जी सुरकुतल्या चेहऱ्याची, टपोऱ्या पाणीदार डोळ्यांची, डोक्यावर पदर घेतलेली, नाकात नथ घेतलेली, कपाळावरती ठसठशीत कुंकवाचा ग...